धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका भाजपाच्या वतीने  तहसीलदार कार्यालयात पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ९५० रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज (बुधवार) मोर्चाद्वारे निवेदन दिले. नायब तहसिलदार अंकुश काकडे यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर शासनाने जाहीर केलेल्या आदेशाची होळी करण्यात आली.

भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे म्हणाले, पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. २०१९ सालाच्या निकषानुसार शेती व सर्व घटकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.

भाजपचे जिल्हा चिटणीस डॉ. सुभाष जाधव यांनी, सरकारने जाहीर केलेल्या मदतीने नुकसानग्रस्त शेतातील वाया गेलेले पीक देखील बाहेर निघणार नाही. या निवेदनाची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व्ही. टी. जाधव, तालुका सरचिटणीस विकास रणदिवे, रामचंद्र पाटील, साताप्पा सुर्यवंशी, संतोष मोगटे, प्रकाश चव्हाण, ईस्माईल जमादार, राम मोहिते आदी उपस्थित होते.