कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपली कार्यालयातील उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसे परिपत्रक आज (गुरुवार) काढण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना आणि कार्यालय सोडताना बायोमेट्रिक यंत्रणा वापरणे बंद करण्यात आले होते. बोटाचा ठसा उमटवत असताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बहुतेक सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. यंत्रणा बंद असल्यास ती सुस्थितीत करण्यास सूचना दिल्या आहेत.