मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवी नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी पाच या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. १० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. या नव्या नियमांचे कठोर पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील. सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकी घ्याव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांनाच कार्यालयात येऊन काम करता येईल. प्रवासादरम्यानही कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतले असतील तरच तुम्हाला प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध असणार आहेत.

सरकारी कार्यालयात आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक, खासगी ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही. लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी. अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी. १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद. हेअर कटिंगची दुकानं ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर पर्यटन स्थळं, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल्स बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे. तसेच नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. यासाठी नाट्यगृह आणि सिनेमागृहाच्या बाहेर ही क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. तसेच नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी द्वावी. मात्र, रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृहे बंद राहणार आहेत.