मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून अनिल देशमुख यांचे गृहखाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून दुसऱे एखादे खाते त्यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख अशा एक नव्हे तर दोन मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. तरीही राष्ट्रवादीकडून त्यांची पाठराखण करत अभय दिले आहे. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर कोणतीही चौकशी होण्याआधीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तसेच आमदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे.