ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा तातडीने सुरू करा : राजू शेट्टी

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन आज मुश्रीफ यांना देण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गेल्यावर्षीपासून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्वत्र व्यवहार खुले झाले असून जवळपास सर्वच कार्यक्रम सुरू आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, लग्न आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शाळा, कॉलेजसना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ग्रामपंचायतींना अद्यापही ग्रामसभा तसेच मासिक बैठक घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकरी कृषि कायदे रद्द करा, या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अजिबात दाद दिलेली नाही. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. सर्वच ग्रामपंचायतींना या कायद्याच्या विरोधात ठराव करायचे आहे. त्यामुळे याची दाहकता केंद्र सरकारपर्यंत जाईल.

लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू आहे. गावातील ग्रामसभा ही तेथील लोकशाहीची मंदिरे आहेत. गावातील अनेक निर्णय प्रलंबित आहेत. त्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा, जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सभा, विविध पक्षांचे संपर्क दौरे, थिएटर सर्वच गोष्टींना सरकारने परवानगी दिलेली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे त्वरित मागे घेण्यासाठी शेतकरी ठराव करून आपल्या भावना राष्ट्रपतींकडे पाठवणार आहेत. यावेळी गिरीश फोंडे, कॉ. नामदेव गावडे, बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, दीपक हेगडे, प्रभू भोजे, सागर कोंडेकर, अविनाश मगदूम आदी पदाधिकारी उपस्थित होते.