एसटी संपावर लवकरच…; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले

0
35

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सर्वांनाच सहानुभूती आहे. त्यांचे समाधान करण्याचे सर्व प्रयत्न सरकार करत आहे. पवार साहेबांसोबत झालेल्या बैठकीत मला असं समजलं की, पवार साहेबांनी परिवहन मंत्र्यांना काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एसटी संपावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संपाबाबत चर्चा केली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत पुढे म्हणाले की, एसटी संपाच्या आगीत तेल ओतण्याचे काम सुरू आहे. ते कोण आणि का करतंय? महाराष्ट्रातलं वातावरण कोण आणि का भडकवतंय हे सर्वांना माहीत आहे, असे सांगून राऊत यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि भाजपचे आ. सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे चार तास चर्चा केली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवर चर्चा कऱण्यात आली होती.