गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या  गारगोटी आगाराचे चालक अशोक कांबळे  आणि वाहक संतोष डांगे  यांच्या प्रामाणिकपणाबद्दल  गडहिंग्लज येथील  ‘जय जवान जय किसान फौंडेशन’च्या वतीने  सत्कार करण्यात आला.

२७ फेब्रुवारी रोजी वैशाली वासुदेव परब, (रा.मुंबई, वडाळा) या गारगोटी -पाटगाव येथे प्रवास करून उतरल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे असलेली पिशवी त्या  बसमध्येच विसरल्या होत्या. या पिशवीत सुमारे साडे तीन लाखांचे सोन्याचे दागिने आणि ३ हजार २०० रूपये होते. बसमध्ये पिशवी विसरल्याचे त्यांच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले.  दरम्यान, शीटवर विसरलेली पिशवी अशोक कांबळे  आणि संतोष डांगे यांनी आगार प्रमुख यांच्याकडे  सुपूर्द केली होती. त्यानंतर संबंधित महिलेच्या ओळखीची खात्री करून त्यांना त्यांची पिशवी परत करण्यात आली.  कांबळे आणि डांगे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सत्कारप्रसंगी आर.व्ही.शेंडे (निवृत्त ऑ.कॅप्टन) माजी सैनिक कुमार पाटील, संतोष पाटील, चंद्रकांत लष्करे, महादेव चिनगुडे, वीरपत्नी वृषाली तोरस्कर, गडहिंग्लजचे आगार प्रमुख  संजय चव्हाण, विजयसिंह शिंदे,  महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेचे अध्यक्ष रणजित रोकडे, प्रभाकर आंबूलकर, आर.जी.पाटील, एम.एस.जगताप,  नंदकिशोर सराटे, एम.डी.मोरे आदी उपस्थित होते.