पगार न मिळाल्याने एसटी बस चालकाची आत्महत्या

0
109

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी एसटी डेपोतील बस चालक पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. यावर तोडगा न निघाल्यामुळे चालकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीच्या  तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एसटी कर्मचारी  आज (सोमवार) आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यातच ही धक्कादायक घटना घडली आहे.  तीन महिने पगार न झाल्याने  एसटी  कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. आता दिवाळीच्या तोंडावर  हातात पैसा नसल्याने त्यांची मोठी  आर्थिक कोंडी झाली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.