कळे (प्रतिनिधी) :  कळे-खेरीवडे येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ५७ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये २८ दिवाणी दावे, ३१ फौजदारी खटले अशी ५९ प्रकरणे दाखल झाली होती.

तसेच बॅंक ऑफ इंडीयाच्या कळे, यवलूज व करंजफेण या शाखांची २६४ दाखलपूर्व प्रकरणे, कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीची थकित घरफाळा व पाणीपट्टी वसूलीची ४३१ प्रकरणे अशी एकूण ६९५ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. सर्व विधिज्ञ, पक्षकार, कर्मचारी यांनी कोरोनाच्या नियमांचे काटोकोर पालन केले. न्यायालयाकडील पाच दिवाणी दावे व   एक फौजदारी खटला मिळून ६ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. त्यातून पाच लाख चौदा हजार तीनशे नव्वद रुपये वसूल झाले.

५१ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यामधून सहा लाख ४४ हजार ७८६ रुपये इतकी बॅंकाची व ग्रामपंचायतीचे थकित रक्कम तडजोडीने वसूल झाली. तालुका विधी सेवा समिती कळे-खेरीवडेचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश विनोद खुळपे यांनी पॅनेल प्रमुख काम पाहिले. तर पॅनेल सदस्य म्हणून विधिज्ञ एम.एस. भोसले व विधिज्ञ विक्रांत पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सर्व न्यायालयीन, बॅंक, ग्रामपंचायत कर्मचारी, विधी सेवा स्वयंसेवक, विधिज्ञ, पक्षकार उपस्थित होते.