कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले नवे कृषी कायदे रद्द व्हावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टोप, शिरोली, मौजे वडगांवसह परिसरात कडकडीत बंद..

टोप (प्रतिनिधी) : येथील शेतकऱ्यांनी तसेच राजकीय पक्षांनी ‘भारत बंद’ला प्रतिसाद देत टोप, शिरोली, मौजे वडगांव या गावांसह परिसरामध्ये मोठे पाठबळ मिळाल्याचे दिसून आले. या तिन्ही गावात आज अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. लहान-मोठे व्यापारी, उद्योजक यांनी या बंदला पाठिंबा देत आपले व्यवसाय बंद ठेवले. तर शिरोली एमआयडीसी पोलिसांच्यावतीने या गावांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला.

धामोडमध्येही उत्स्फूर्त बंद..

धामोड (प्रतिनिधी) : तुळशी-धामणी परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या धामोड गावात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या विरोधात धामोड परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला. त्याला धामोड येथील जय भानोबा व्यापारी असोसिएशनने सर्व दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला.

आळतेमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद..

हातकणंगले (प्रतिनिधी) : केंद्र सरकार विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला हातकणंगले तालुक्यातील आळते गावात आणि परिसरातील बाजारपेठेत संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या आजच्या बंदला आळते येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला.