धामोड (प्रतिनिधी) : तब्बल एक महिन्याच्या अविरत पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, काल दुपारनंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यामुळे धामोड परिसरात रोप लागणीला वेग आला आहे.

यावर्षी रोहीणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने या नक्षत्रातच जवळपास सर्व शेतकऱ्यांची पेरणीची कामे पूर्ण झाली. परंतु त्यानंतर निम्मा मृग आणि आद्रा नक्षत्र पुर्ण गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. परंतु, काल दुपारनंतर पुनर्वसु पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने ग्रामीण भागात रोप लागणीच्या कामाला वेग आला आहे. याआधी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने रोप लागणी केली जात होता. पण, या  पद्धतीला बगल देत ग्रामीण भागातील युवकांनी रोटावेटरचा वापर करून रोपलागण करताना दिसत आहे. एकंदरीत पावसाच्या आगमनाने शेतकरी समाधानी आहे.