हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नगरपरिषदेच्या ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात विशेष वाढीव राहणीमान भत्ता लागू तसेच कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिपावली पूर्वी स्वानुग्रह अनुदान देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी दिली.

हुपरी नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर तांत्रिक व शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांचे विभागीय आयुक्त,पुणे यांच्या आदेशानुसार समावेशन झाले. तथापि उर्वरित समावेशन न झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कालावधी प्रमाणे वेतन दिले जाते. ही खंत ओळखून सुमारे ४९ कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा जयश्री गाट आणि मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार तसेच संपूर्ण सभागृहाने एकमताने मंजूरी देऊन दिवाळीवेळी किमान वेतन लागू केले होते. त्याप्रमाणे यावर्षीही सदर किमान वेतनात शासनाच्या निर्देशानुसार मंजूर राहणीमान भत्ता ५२५० रुपये देण्यासाठी नगराध्यक्षा गाट यांच्याकडे विनंती केली असता, सर्व सभागृहाची मंजुरी घेऊन मुख्याधिकारी कुंभार यांनी ही वाढ लागू केली. यासाठी युवा नेते अमित गाट यांनी विशेष प्रयत्न केले.