मुंबई (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटात यांच्यामध्ये महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय युतीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी असलेले मतभेद समोर आले आहेत. नाशिकमध्ये आयोजित संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्यासपीठावरून वादग्रस्त विधान केले आहे.

नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्यासपीठावरून वादग्रस्त विधान केले तेव्हा शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यासह नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बरबने यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मत व्यक्त केले. त्याविषयी भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत स्वातंत्र्यवीर सावरकर व महापुरुषांविषयी आपल्यासारख्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या तुरुंगाची आपण स्वतः पाहणी केल्याचेही नमूद केले.