इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी चिन्मय चौगुले, निरंजन चौगुले, विनय भांडेकर व सुरज कोष्टी यांनी प्रा.डॉ.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय. व सी.आय. इंजिनमधील ध्वनी व वायु उत्सर्जन नियंत्रित करणारे यंत्र बनविले आहे. हा उपक्रम ऑटोमोबाईल उद्योगासाठी व विविध प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.  

ऑटोमोबाईल इंजिनमधून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, बर्न न झालेले हायड्रोकार्बन व इतर घटकांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने  ‘डिझाईन अँन्ड डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅक्वा सायलेन्सर फॉर एस. आय. अँड सी. आय. इंजिन इमिशन्स अँन्ड नॉईज कंट्रोल’ शीर्षकांतर्गत सायलेन्सर विकसित करण्यात आले आहे. या सायलेन्सरमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत होईल. हे सायलेन्सर कमी खर्चात तयार केलेले असून या सायलेन्सरमधून होणारे वायू उत्सर्जन हे बीएस-६ च्या नॉर्मस् पेक्षा कमी आहे.

या प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील ‘जागृती प्रोजेक्ट कॉम्पिटिशन इन इग्निशन २ के २०’ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या संशोधनासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.