कागल ( प्रतिनिधी) : ‘सेवा आणि सुश्रूषा हाच आमचा धर्म’ असे मानून राजे फाऊंडेशनमार्फत आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सहकार्याने कागलमध्ये हॉस्पिटल सुरू केले आहे. आर्थिक परिस्थिती  बरी नाही म्हणून कोणी उपचार घेण्याची राहू नये हाच हे हॉस्पिटल सुरू करण्यामागचा दृष्टिकोन आहे. नजीकच्या काळात कागलमध्ये पहिले मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.

राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होममार्फत आरोग्य शिबिर व आरोग्य कार्ड वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, केवळ लोकसेवा या उदात्त हेतूनेच ही हॉस्पिटल सेवा आम्ही सुरू केली आहे. या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांवर याच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. कागलमध्ये लवकरच सर्व सोयींनीयुक्त १०० बेडचे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन आहे. अशाच प्रकारचे हॉस्पिटल मुरगूडमध्येही सुरू करण्याचे नियोजन आहे. यापुढे कागल कॅन्सरमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असेही घाटगे म्हणाले.

या आरोग्य शिबिरात ४६० हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. डॉ. चेतन कुलकर्णी, डॉ. आशीष देशपांडे, डॉ. अजिंक्य देशपांडे, डॉ. संदीप पाटणे, डॉ. हिर चंदवानी, डॉ. महेंद्र पाटील, एस. बी. कांबळे यांनी तपासणी केली. डॉ. रश्मी पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. संजय देसाई, डॉ. सानिया पठाण आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कागलचे पत्रकार कै. प्रकाश नाईक हे तीन-चार वर्षे डायलिसीससाठी कोल्हापूरला जात होते. त्यांच्या आजारपणात मी त्यांना भेटण्यासाठी गेलो असताना ते म्हणाले होते, राजे तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात एवढे चांगले काम करत आहात तर कागल शहरात डायलिसीसची सुविधा नाही. त्यामुळे कागल तालुक्यातील डायलिसीस रुग्णांसाठी कागल शहरात डायलिसीस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली होती. आज या वैद्यकीय सेंटरवरून डायलिसीस सेवा सुरू करत असल्याचे डॉ. संजय देसाई यांनी जाहीर केल्याने नाईक यांची इच्छा पूर्ण होत आहे, असे घाटगे म्हणाले.