शिरोळमधील पूरग्रस्तांना भरपाई देण्याबाबत लवकरच निर्णय : विजय वडेट्टीवार

0
26

मुंबई (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जी गावे महापुरात सापडली होती त्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते, अशा सर्व गावांना आणि त्या गावातील प्रत्येक परिवाराला सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा. अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

शिरोळ तालुक्यात २०१९ च्या महापुरानंतर नुकसानीचे पंचनामे होऊन महाविकास आघाडी सरकारने पुरग्रस्तांना चांगली मदत केली होती परंतु काही चुकीच्या निकषामुळे अनेक नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले होते, यामध्ये शेतकऱ्यांचे  विद्युत मोटारी व संच, शेडनेट, ठिबक सिंचन पाईप्स व ग्रीन हाउस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती,  सहकारी संस्था व खाजगी मालकीच्या गोडाऊनमधील खत आणि औषधांचे नुकसान, कुक्कुटपालन व्यवसायाचे देखील नुकसान झाले आहे. यावेळी पंचनामे करताना नुकसान भरपाईबाबतचे असलेले निकष बदलावेत असे मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे आग्रह केला असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले,

तसेच महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील पुरबाधित जनतेला दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरबाधितांसाठी अकरा हजार पाचशे कोटीचे पॅकेज जाहीर केले. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी  आभार मानले.