लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होणार : कंबोज

0
28

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या या दाव्यानंतर आता कोणत्या नेत्याच्या पाठी तपास संस्थांचे शुक्लकाष्ठ लागणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ते म्हणाले की, लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची नवाब मलिक आणि अनिल देशमुखांशी भेट होणार आहे.

राष्ट्रवादीचे दोन बडे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख आधीच तुरुंगात आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. याआधीही नवाब मलिक यांच्या अटकेपूर्वी कंबोज यांनी याच आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर मलिकांना अटक झाली होती. यामुळे त्यांचे हेही भाकीत खरे होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत खुलासा करणार असल्याचे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देश-विदेशात मालमत्ता, बेनामी कंपनी, महिला मित्राच्या नावावर मालमत्ता, मंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार केला. कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तेची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. मोहित कंबोज मोठा खुलासा कधी करणार हे ठरलेले नसून कंबोज यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. कंबोज यांच्या ट्विटमध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख असल्याने कंबोज यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडताना त्यांचा खुलासा होताना दिसत आहे.