नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले आहे. प्रणव मुखर्जी यांचे ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.

२००४ साली मला पंतप्रधान केले असते तर एवढा दारुण पराभव झाला नसता, असे काही काँग्रेस नेत्यांना वाटत होते, असेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. आपण राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाचे राजकीय भान हरपले. सोनिया गांधी पक्षाचा कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्या. डॉ. मनमोहन सिंग यांचा तर खासदारांशी व्यक्तिगत संपर्कच संपलेला होता, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की नाही, याचीही चर्चा सुरु आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसच्या अधोगतीविषयी अनेक खुलासे केले आहेत. पुढील वर्षी बाजारात येणाऱ्या या पुस्तकात  २०१४ मधील काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले आहे.  या राष्ट्रपती भवनातील प्रवासाचा उल्लेखही आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर ‘द प्रेसिडेन्शिअल इयर्स’ या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले होते.