जुन्नर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात कोरोनासारखा दुश्मन वावरत आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असे सांगून साप तसे अजूनही आहेत. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर आज (शुक्रवार) तोफ डागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, माझं हे शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. महारांजापुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे ऊर्जास्त्रोत आहेत. आमच्या मनात, हृदयात अखंड शिवरायांचं स्थान आहे.

शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या, हे सांगताना इंगित विद्याशास्त्र महाराजांना अवगत होते. असे सांगून ही भाषा दादांना (अजित पवार) येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला.