मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अनेक ठिकाणी एसआरएचे गाळे बेकायदा ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

निर्मलनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, राज्य शासनाचे गृहनिर्माण विभागासह ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात पेडणेकरांवर गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी.

पेडणेकरांनी केलेल्या एसआरए घोटाळाप्रकरणाचे सर्व कागदपत्रे, पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोमय्यांनी सांगितले. सोमय्या म्हणाले, २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांनी जे निवडणूक शपथपत्र भरले, त्यात त्या स्वतः गोमाता जनता एस.आर.एच्या सहाव्या मजल्यावर राहत आहे, असे लिहिले आहे.

सोमय्यांनी सांगितले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही स्पष्ट केले आहे की, किशोरी पेडणेकर यांना कोणताही गाळा देण्यात आलेला नाही. त्या तेथे झोपडपट्टीत राहत नव्हत्या. किशोरी पेडणेकर व त्यांच्या परिवाराने अशाच पद्धतीने स्वतःची किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया कंपनीच्या नावाने गोमाता जनता एस. आर. ए मधील तळमजल्यावरील गाळा क्र. ४ व ५ ही ताब्यात घेतला. हा गाळा अन्य लोकांच्या नावाने असताना किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया यांनी खोट्या पद्धतीने या गाळ्यावर कब्जा केला आहे.