गगनबावडा तालुक्यातला ‘खाकी’ वर्दीतील समाजसेवक…

0
251

साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याला ढगफुटी सदृष्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गगनबावडा तालुक्याला पावसाचे प्रमाण असते. यावेळी अतिवृष्टीने कुंभी नदीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. तालुक्यातील अनेकांच्या घरात पाणी शिरून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. याचवेळी पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर गगनबावडा पोलीस ठाण्याचे सपोनि. रणजीत पाटील यांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.

सपोनि. रणजीत पाटील यांनी कोरोनाच्या काळामध्येही ३०० ते ४०० कुटुंबांना मिशन संवेदना अंतर्गत गरजू कुटुंबांना मदत केली आहे. तसेच पुरस्थितीमध्येही ज्या घरात पाणी शिरले अशा असळज येथील २९ तर शेणवडे येथील ७ कुटुंबांना स्वतः प्रयत्न करत दानशूर व्यक्तिंकडून ब्लँकेट आणि बिस्कीटाचेही वाटप केले. एरव्ही कायदा, दरारा आणि धाक असणारे कर्तव्यदक्ष पोलिस म्हणून पुढे येणारे पाटील यावेळी मात्र समाजसेवकाच्या रूपात दिसून आले. पाटील यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होवू लागली आहे.

यावेळी कर्मचारी अमर चव्हाण, असळजचे पोलिस पाटील अरूण गावकर, असळज, शेणवडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.