मुंबई (प्रतिनिधी) : सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असते, ते नाईट लाईफसाठी नसते ? असे म्हणत नाईट लाईफ चालू राहण्यासाठी सरकारनेच आदेश दिले आहेत. या सर्व प्रकारांमधून आता सरकारचा खरा चेहरा समोर येत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी फडणवीस आज (सोमवार) पत्रकारांशी बोलत होते.

वरळीमधील एका पबमधील गर्दीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, सोशल डिस्टन्सिंग वगैरे फक्त शिवजयंतीसाठी, नाईट लाईफचे तर आदेश मिळालेत, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नांव न घेता लगावला. वरळीच्या लोकांचे म्हणणं त्यांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींच पूर्णपणे ऐकतात. त्यामुळेच कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला नाईट लाइफ पहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबईमधील नाईट लाईफला चालना देण्याची गरज असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अनेकदा म्हटले आहे. त्यांच्या वरळी मतदारसंघामधील काही क्लब आणि पबचे व्हिडिओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर कोरोनाचे निर्बंध असतानाही या गोष्टींना परवानगी देण्यावरुन आता टीका होऊ लागली आहे.