पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. पुण्यात रविवारी झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार २१ फेब्रुवारी) पार पडला. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार २२ फेब्रुवारी) लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते. पण धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क घातले नव्हते.