कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात नऊ ते दहा कोटी लिटरची पाण्याची मागणी असतानाही १४.५० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, तरीही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार का ? तसेच पाणीपुरवठा विभागाला महापालिकेकडून निधी का द्यावा लागतो, असे सवाल करत, उत्तम नियोजन, काटकसर व लोकभिमुख कारभारातून महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग स्वयंपूर्ण करावा, अशा सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.

महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहीते, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, जल अभियंता नारायण कुंभार, हर्षजीत घाटगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार जाधव यांनी बालिंगा, पुईखडी, कळंबा व बावडा येथील फिल्टरेशन प्लॉन्टची माहिती घेऊन या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती बाबत सुचना केल्या. पंप हाऊसची स्वच्छता करून रंगरंगोटी करून घ्यावी, महिन्यातून एकदा फिल्टरेशन प्लॉन्ट व पंप हाऊसची देखभाल दुरुस्ती करावी. अमृत योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, बालिंगा पंप हाऊसवरील गळती काढण्यासाठी प्रस्ताव तयार करा. ज्या पाण्याच्या टाक्यांना झाकण नाही, ती त्वरीत बसवण्यात यावीत, अशाही सूचना दिल्या.

पाणीपुरवठा विभागाला वर्षाला महापालिकेतून पैसे घ्यावे लागतात, हे बरोबर नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःची योजना म्हणून काम करावे. शिस्त, उत्तम नियोजन, काटकसर व लोकभिमुख कारभारातून पाणी योजना स्वयंपूर्णच नव्हे तर फायदयात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयातील पाणी पुरवठ्याची थकबाकी २० कोटी रुपये असल्याचे जल अभियंता नारायण भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. या थकबाकीच्या वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले. शहरातील घरफाळा व पाणीपट्टीतील थकबाकीवरील दंडात पन्नास टक्के सवलत देण्याची सूचना आमदार जाधव यांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे केली असता याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले. तसेच एका वेळी सर्व व्हॉल्व्हच्या ठिकाणी चेंबर बांधण्याऐवजी टप्याटप्याने खराब होणाऱ्या व्हॉल्व्हचे काम करताना चेंबर बांधण्याचे डॉ. बलकवडे यांनी मान्य केले.