मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची, असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत राजकीय पक्षांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यायला हवी, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला कोकणातील स्थानिक नागरिकांकडून विरोध होऊ लागला आहे. तर यावरून राजकारण सुरू झाले आहे. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी कोणी काहीही म्हणू दे… महाराष्ट्र फर्स्ट… असे धडाकेबाज धोरण असायला हवं, असा सल्ला देताना पत्रात म्हटले आहे की,

मला मान्य आहे की या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठी उभे राहिले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही. आज करोनानंतर ( लॉकडाऊन नंतर) परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभं राहाण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवं. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांनाच प्राधान्य असायला हवं असा करार सरकारने गुंतवणूकदार कंपनीसोबत करायला हवा. तसंच या प्रकल्पामुळे जे उद्योग निर्माण होतील त्यात देखील कोकणी तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणं इत्यादी गोष्टी व्हायला हव्यात.