अहमदनगर  (प्रतिनिधी) : यापूर्वीही केंद्र सरकारने दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप करून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाहीत,  तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन दिल्लीमध्ये करेल,  असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (मंगळवार) येथे दिला. 

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तर आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णांनी राळेगणसिद्धीमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एक दिवशीय उपोषण केले.  यावेळी ते बोलत होते.

अण्णा हजारे म्हणाले की,  कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता,  आणि स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार  पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा हमी भाव देण्याची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी एकदा दिल्लीत तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. त्या वेळेस केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते. पण  स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळालेली नाही.