कळे (प्रतिनिधी) : धामणीखोऱ्यातील बळीपवाडी (ता. पन्हाळा) येथील एकलव्य अॅकॅडमीमार्फत होणाऱ्या सैन्यभरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेळेनुसार विविध योजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये १६०० मीटरचे अंतर ४ मिनिटे ३० सेकंदात पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ‘बुलेट’ दुचाकी मोफत देणार असल्याची घोषणा अॅकॅडमीचे प्रशिक्षक आबासाहेब बळीप यांनी केली आहे. 

धामणीखोऱ्यात अतिशय कमी वेळात एकलव्य अॅकॅडमीचे सैन्यभरती व पोलीस भरतीमध्ये शंभरहून जास्त विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे सैनिक अथवा पोलीस बनण्याचे स्वप्न असते. पण काही विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीमुळे कोणत्याही अॅकॅडमीत प्रवेश घेता येत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, फीमध्ये सवलत देऊन या विद्यार्थ्यांची जिद्द व आत्मविश्वास वाढावा यासाठी एकलव्य अॅकॅडमीत निम्मी फी माफी, संपूर्ण फी माफी, डाएट खर्च माफ या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सैन्य भरतीसाठी विद्यार्थी १६०० मीटर अंतर किती वेळात धावतो याची चाचणी करून केवळ साडेचार मिनिटांत हे अंतर पूर्ण करणाऱ्यास बुलेट बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे एकलव्य अॅकॅडमीच्या या योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन प्रशिक्षक बळीप यांनी केले आहे.