…तर प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार

0
109

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वाथ्यामुळे सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याच्या तयारीत आहेत. तर   पक्षातील अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर  एप्रिलमध्ये अध्यक्षपदासाठी संघटनात्मक निवडणूक घेण्याचा विचार सुरु  झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील, तर त्यांची बहिण प्रियंका गांधी वाड्रा या अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार असतील,  अशी चर्चा सुरू झाली आहे.

गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उमेदवारीसाठी तयार झाल्यास   काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस  निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा विपरित परिणाम होईल, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे. काँग्रेसला एकमेव पर्याय म्हणजे पक्षाला स्थिर करणे आणि नंतर कोणत्याही प्रकारच्या पुनर्बांधणीसाठी तत्पर राहणे,  जेणेकरून गांधी कुटुंबातील एखादा सदस्य पदभार स्वीकारण्यास तयार होऊ शकेल, असे राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांचे मत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल,  तामिळनाडू, आसाम, या  प्रमुख राज्यांच्या आगामी निवडणुकांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.