कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात पाहणी करून पुरातत्व खात्याच्या राज्य संचालकांशी चर्चा केली जाईल. याविषयी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवू. अतिक्रमणावर पुरातत्व खात्याने कारवाई करणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढण्यास पुरातत्व खात्याने तयारी दाखवल्यास पोलीस बंदोबस्त देऊ, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.  

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमणबाबत दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदवावेत, पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक उभारावे, गडावरील सर्व मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यांची माहिती देणारे फलक लावावेत, गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींना प्रतिबंध करावा, श्री वाघजाईदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, किशोर घाटगे, रमेश पडवळ, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट, समन्वयक किरण दुसे, रामभाऊ मेथे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, सतीश पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.