पुणे (प्रतिनिधी) :  जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी  होणार होते. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसाने अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये,  या पुतळ्याचे अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळे आम्हीच हा सोहळा आज (शुक्रवारी) पार पाडला, अशी माहिती भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी ( दि.१३) या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्यानंतर  पडळकर यांनी शरद पवार  यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पडळकर म्हणाले की,  अहिल्यादेवी यांचे काम अखंड भारतात आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचे काम आहे. शरद पवार यांची प्रतिमा बरोबर उलटी आहे. अहिल्यादेवी प्रजाहित दक्ष होत्या. पवार हे नेमके प्रजेच्या विरोधी आहेत. वाईट प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणे म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे. म्हणून आज आम्ही पुतळ्याचे उद्घाटन केले आहे.