…तर कोल्हापूरला राज्यसभेचे प्रतिनिधित्व नक्की

0
204

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सध्या राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवर नुकतेच कोल्हापूरमधून प्रतिनिधित्व केले आहे. आता राज्यसभेची निवडणूक लागल्यानंतर कोल्हापूर या निवडणुकीच्या निमित्ताने मध्यभागी केंद्रस्थानी आले आहे. स्वतः संभाजीराजे राज्य राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून मैदानात उतरत आहेत. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संजय पवार हे मैदानात उतरले आहेत. तर भाजपाकडून कोल्हापुरातील माजी खा. धनंजय महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. महाडिक यांना उमेदवारी मिळणार की नाही हे उद्या निश्चित होईल. पण सध्या चर्चेच्या यादीत महाडिकांचे नाव अग्रभागी असल्याचे समजते. यावरून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर हे राज्याच्या राजकारणाचे अनुषंगाने महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरल्याचे अधोरेखित होत आहे.

यापूर्वी कोल्हापूरमधूनच महाविकास आघाडीचा पॅटर्न जन्मास आला आणि विधानसभा निवडणुकीनंतर तो संपूर्ण राज्यात राबविला गेला. यामुळेच भाजपा आज विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. तेंव्हापासूनच कोल्हापूरच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने संपूर्ण ताकत लावून एकसंध होऊन हे निवडणूक जिंकली. भाजपनेही ही निवडणूक इर्षेची केली होती. या निवडणुकीकडे आगामी राजकीय वातावरण तपासणीच्या अनुषंगाने सर्वांनीच चाचपणी करून पाहिली संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले होते. यातूनच भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे हे समजायला सोपे जाणार होते. या निवडणुकीनंतरच राज्यसभेची मुदत संपली आणि ही निवडणूक लागली.

कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राज्यसभेची निवडणूक ही सध्या संभाजीराजे यांच्यावरून सुरू होऊन आता त्याची वातावरण निर्मिती संपूर्ण कोल्हापुरात झाली आहे, याचे कारण ही असेच आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांना पाठिंबा नाकारून जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेच्या मैदानात उतरवले आहे. तर दस्तुरखुद्द संभाजीराजे यांनीही अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

एवढे सगळे होत असताना भाजपनेही कोल्हापूरलाच आपला केंद्रबिंदू म्हणून माजी खा. धनंजय महाडिक यांचे नाव पुढे केले आहे. अद्याप महाडिक यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला नसला तरी चर्चेत मात्र ते पुढे आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूरातून दोन उमेदवार उतरत असल्याने भाजपही महाडिक यांना उमेदवार देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असं झालं तर कधी नव्हे ते कोल्हापुरातून राज्यसभेसाठी तब्बल तीन उमेदवार मैदानात असणार आहेत. आणि कोल्हापूरच्या पदरात पुन्हा एकदा राज्यसभेचे प्रतिनिधित्व शंभर टक्के पडणार असेच दिसून येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर हे राज्यामध्ये पुन्हा एकदा केंद्रबिंदू असून आगामी काळात कोल्हापूरला याचा कितपत फायदा मिळणार हेच पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.