मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. सिनेमांसोबतच करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. सैफ अली खानसोबत लग्न असो किंवा मुलांची नावं करीनाच्या चर्चा कायमच रंगल्या. करीना यावर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे.  

काही सेलिब्रिटींप्रमाणे करीनाला देखील आई होण्याआधी फिगर खराब होऊन याचा करिअरवर परिणाम होण्याची चिंता सतावत होती. त्यामुळे सरोगसीचा विचार तिच्या मनात आला होता. याबाबत एका मुलाखतीत करीनाचा पती सैफ अली खानने खुलासा केला होता.

सैफ म्हणाला की, जेव्हा मी आणि करीना डेट करत होतो, तेव्हा ती झीरो फिगर होती. तिला इंडस्ट्रीमध्ये चांगली कामं मिळतं होती. त्यामुळे प्रेग्नेंसीचा विचार तिच्या मनात आल्यावर ती थोडी चिंतेत असायची. कारण याचा परिणाम तिच्या करिअरवर होण्याची भीती तिला होती.  तसेच जेव्हा मी करीनासोबत पहिल्यांदा मुलाचा विषय काढला. तेव्हा तिची सरोगसी करण्याचा विचार होता, असा खुलासा सैफने केला. मात्र, काही काळाने करीनाला जाणवलं की आयुष्यात काही गोष्टींमध्ये आपलं १०० टक्के योगदान देणं गरजेचं असतं आणि तिने आई होण्याचा निर्णय घेतल्याचे सैफ म्हणाला.