राशिवडे (प्रतिनिधी) : कामगार कल्याणकारी मंडळामार्फत  कामगारांसाठी सुरू असणारी मध्यान्ह भोजन योजना अयोग्य नियोजनामुळे कुचकामी ठरली आहे. तर ती योजना बंद करून त्याऐवजी शासनाने दुसरा पर्याय उपलब्ध करावा,  अशी मागणी लालबावटा कामगार संघटनेने  कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी संदेश आयरे  यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात गोरगरीब श्रमिक वर्गासाठी शासनाने कामगार कल्याण मंडळामार्फत इमारत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. पण ही योजना यशस्वी होण्याऐवजी योग्य नियोजनाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एकाच ठिकाणी जेवण तयार करून  पूर्ण जिल्हाभर वितरित करण्याचा ठेका एका कंपनीला दिला आहे. त्यामुळे  जेवण वेळेवर पोहोच न होणे आणि तसेच जेवणाचा दर्जा खालावण्याचा प्रकार घडू लागला आहे. सकाळचे जेवण दुपारी आणि संध्याकाळचे जेवण रात्री उशिरा पोहोच होत आहे. तर नियमानुसार जेवणासोबत मिळणारे स्वीट, कोशिंबीर, लोणचे असे पदार्थ बहुतांशी वेळा मिळतच नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वेळेवर दर्जेदार  जेवण मिळणार  नसेल, तर तुमचे जेवणच नको, अशा मानसिकतेत कामगार आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेऊन  जेवण देण्याऐवजी नोंदीत कामगारांना ओळखपत्रानुसार रेशन धान्य दुकानांमधून महिन्यासाठी पुरेल इतकी शिधा उपलब्ध करून द्यावी किंवा सरकारने  कामगाराच्या खात्यावर रोख रक्कम जमा करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत लवकर मार्ग नाही काढला, तर  आंदोलन करण्याचा इशारा  लालबावटा संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी दिला आहे. यावेळी राधानगरी तालुका अध्यक्ष संदिप सुतार, कागल तालुका अध्यक्ष विक्रम खतकर, संदिप यादव, प्रकाश रामाणे आदी उपस्थित होते.