अमरावती (प्रतिनिधी) : ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करत आहे. भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याआधी राज ठाकरे, शरद पवार आणि आता प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, अशी टीकाही त्यांनी केली.

पत्रकारांशी बोलतांनी त्यांनी चौफेर आरोप केले. ते म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाहीची आणि घटनेची पायमल्ली करत आहे. भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली आहे. एकाही भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही? केंद्राकडून याचे राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो.