कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे महाविद्यालयांचे कामच आहे, जर एखाद्या महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शासनाच्या शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करावे, अशा सक्त सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.

पुणे विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली.

ते म्हणाले की, समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतल्यास त्या त्या जिल्ह्याच्या विकासात देखील मदत होईल. या विभागाच्या माध्यमातून अन्याय झालेल्या अन्यायग्रस्त व्यक्तींना आधार दिला गेला पाहिजे. त्यांना उद्योग उभारणीसाठी व त्यांना स्वावलंबन बनवण्यासाठी जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना उत्पन्नाचे साधन देखील विभागाच्या वतीने कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, याचा देखील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा.

यावेळी सहआयुक्त भारत केंद्रे, सहआयुक्त वृषाली शिंदे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह पुणे विभागातील सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यावेळी उपस्थित होते.