महाबळेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आता पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा ३ ते ४ अंशापर्यंत खाली गेला आहे.

वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटे वाहनांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये-जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाल्याचे चित्र दिसले. लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वर सोडून २० किमी खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरकाची मात्र पर्यटक अनुभवत आहेत. सध्या वेण्णालेक परिसरामध्ये होणारे हिमकण पाहण्यासाठी व गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटनाची पावले या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी वळत आहेत. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महाबळेश्वर पर्यटनास आलेले पर्यटक या कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी असे गरम वस्त्रे परिधान करुन गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेत देखील उबदार शाल, स्वेटर मफलर, ब्लँकेट्स आदींच्या खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. हॉटेल्समध्‍ये पर्यटकांसाठी बॉनफायरची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.