कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,  सांगली,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली आणि तपासणी करता फरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेली दारू याच लॅबमधील दारू बंदी विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर लाटल्याप्रकरणी सात जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहा. संचालक प्रदीप गुजर यांनी फिर्याद दाखल केली असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दि. २६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर एकजण फरार आहे.

वसंत गौड (वय ४७, रा. पिंजर गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा), अक्षयकुमार भालेराव (वय ३३, रा.सुर्वे कॉलनी, न्यू शाहूपुरी),  मारुती भोसले (३४, रा. शाहूपुरी दुसरी गल्ली), राहुल चिल्ले (वय ३५, चौथा बसस्टॉप फुलेवाडी), गणेश सपाटे (वय ३०, बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर), विरुपाक्ष पाटील (वय २५, रा. विचारे माळ, सदर बाजार, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिलिंद पोटे (वय ४९, रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी विविध गुन्ह्यातील तपासाकरिता चार जिल्ह्यासाठी फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली. कोल्हापूरसह सांगली,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली आणि तपासणीकरिता या लॅबकडे पाठवली जात होती. लॉकडाऊन काळात दारूबंदी विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी करता आलेली दारूची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक प्रदीप गुजर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर वरील सहा जणांना अटक केली आहे.