पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथे आठ दिवसापूर्वी केबल व्यावसायिक विवेक दिनकर चौगुले (वय २५)  याला  दहा-बारा जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली होती. यातील संशयित नितीन भीमराव धनगर, अजित अशोक पाटील,शुभम पिंटू पाटील, महेश उर्फ पोपट धोंडीराम म्हमाणे, अवधूत लक्ष्मण माळी व प्रकाश उर्फ निवास लक्ष्मण माळी (सर्व रा. आसुर्ले) यांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली. आज (सोमवारी) पन्हाळा न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.

पन्हाळा पोलीस आणि घटनास्थळावरून ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि संशयित आरोपींच्या दोन गटात चार महिन्यापूर्वी लग्नाच्या वरातीत पूर्ववैमनस्यातून मारामारी झाली होती. पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. त्यातूनच आठ दिवसापूर्वी विवेक चौगुले हा आसुर्लेकडे घरी येत असताना आसुर्ले नजीक कोतोली नांदगाव मार्गावर चौगले विहिरी शेजारील निर्जन ठिकाणी दहा ते बारा जणांनी काठी व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. चौगुले याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पन्हाळा पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत होते. पण ते सापडत नव्हते.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने अखेर संशयित सहाजणांनी रविवारी पन्हाळा पोलिसात शरणागती पत्करली. या घटनेचा तपास पन्हाळा पोलीस स्टेशनच्या सपोनि शैलजा पाटील करत आहेत.