कोल्हापुरात ‘अग्निपथ’ योजना रद्दसाठी ठिय्या आंदोलन

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने तीनही सेनादलाच्या नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आणि ही योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील टेंबलाई मंदिर येथे राज्य अग्निपथविरोधी कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील युवकांनी भाग घेतला होता.

गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे जवानांची भरती होऊ शकली नाही. गेली अनेक वर्षे सैन्यदलामध्ये भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरली आहे. भरती केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागलेली असतानाच संरक्षण मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया स्थगित करून अग्निपथ या हंगामी भरतीची योजनेची घोषणा केली आहे.

केंद्र सरकार अग्निपथ योजनेमुळे जवानांच्या संख्येत वाढ होणार असे म्हणत जरी असले तरी देखील सरासरी एका वर्षी अग्निपथ योजनेतून एका तालुक्यातील फक्त साठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. यापूर्वी हाच आकडा साधारणपणे १०० पेक्षा जास्त होता, असे कृती समितीने म्हटले आहे.

राज्यामध्ये देखील अग्निपथ विरोधी कृती समितीतर्फे मोर्चाद्वारे सेना दलाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संदीप गिड्डे पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, आनंद राव पवार, अखिलेश वाले, आण्णासाहेब काकडे, महेश बोरनाक, ऋषीकेश पाटील, तानाजी डोईफोडे, प्रकाश थोरबोले, गणेश गारळे, सुशांत मिसाळ, संदीप कोळी, विजय वाघरे, दयानंद साळवी, सूरज गावडे, गणेश शेवाळे, अभिजित पाटील, दयानंद किल्लेदार, योगेश पाटील, सुनील पाटील, मनोज गायकवाड, अमित मालगावे, संपत सावंत आदी सहभागी झाले होते.