‘कोरोना लसी’च्या कच्च्या मालाचा पुरवठा अमेरिका, युरोपने रोखला : पूनावाला

0
83

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्णांना लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने नागरिक काहीसे बिनधास्त होते. आता मात्र लसीच्या निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. ‘कोविशिल्ड’ या लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी सांगितले की, लसीसाठी आवश्यक असणारा कच्च्या मालाचा पुरवठा अमेरिका आणि युरोपने रोखला आहे. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल उपलब्ध करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातून लसींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी आत्तापासूनच करोना लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्राकडून मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात करोना लसींची मागणी अजून वाढणार असताना लस निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब मानली जात आहे.

आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. ६ महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण सध्या आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.