ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप मंत्री मुश्रीफ, राज्य सरकारचे : समरजितसिंह घाटगे

0
29

कागल (प्रतिनिधी) : मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारने दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांची पाठराखण करण्यासाठीचा वेळ घालवला. तो ओबीसी आरक्षणासाठी, इंपीरिकल डाटा न्यायालयात सादर करण्यासाठी दिला असता तर ओबीसी आरक्षण वाचले असते. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारचे असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला. ते वडवाडी येथील नागरिकांना ई-श्रम कार्ड वाटपावेळी बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना कोर्टाने एकाचवेळी ओबीसी आरक्षणासाठी ईंपीरिकल डाटा सादर करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांना वाचविण्यासाठीचा वेळ घालवला. हा वेळ जर डाटा सादर करण्यासाठी दिला असता तर मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्राचेही ओबीसी आरक्षण वाचले असते. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत आहे.

राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे नबाब मालिकांच्या समर्थनात कोल्हापूर आणि कागल येथे मोर्चा आंदोलन काढण्यासाठी वेळ देतात. पणओबीसी आरक्षणासाठी ते कधीही रस्त्यावर उतरले नाहीत किंवा विधानसभेत अवाक्षरही काढलेले नाही. तरी अजुनही वेळ गेलेली नाही हा डाटा लवकर संकलित करून सादर करा. तुम्ही जोपर्यंत हा डाटा न्यायालयात सादर करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी नगरसेविका आनंदी मोकाशी, हौसाबाई धुळे, सुमन कुराडे, संगिता पोवार, रेवती बरकाळे, सतीश पाटील, राजेंद्र जाधव, आप्पासो हुच्चे, उमेश सावंत, सुशांत कालेकर,गजानन माने,सचिन निंबाळकर उपस्थित होते.