कोल्हापूर (प्रतिनिधी) : हुपरी येथील प्राथमिक शाळेजवळ राहणारे राहणारे चांदी व्यावसायिक अमोल बजरंग माळी (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी बंदूकीने डोक्यात गोळी झाडून घेऊन आज (मंगळवार) आत्महत्या केली. कोरोना आजारातून नुकतेच बरे होऊन आलेले माळी यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे हुपरी पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले.

हुपरी येथील माळी हे बडे चांदी व्यावसायिक म्हणून परिचित होते. स्वसंरक्षणासाठी त्यांनी बंदुकीचा परवाना घेतला होता. ते जवळ बंदूक बाळगत होते. लायन्स क्लबसह विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते लोकांच्या मदत कार्यासाठी कायम धावून जात होते. या घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेंद्र म्हस्के पोलीस पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला. हुपरीत एक महिन्यापूर्वी एका चांदी उद्योजकाने अशीच स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने चांदी व्यवसायिक चिंता व्यक्त करीत आहेत.