रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेवर शिक्षक संघटनांचा मूक मोर्चा

0
102

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ आज (शनिवार) शहर व जिल्हा नागरी कृती व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने जय भारत शिक्षक संस्थेवर मूक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थाचालक परशुराम जाधव यांच्यावर शिक्षकांच्या पगारातून दरमहा एक दिवसाचा पगार कट करतात, वेतन आयोगातील संपूर्ण फरक शिक्षकांकडून काढून घेणे, वरिष्ठ निवड, वेतन श्रेणी न देणे, शिक्षकांना घरची कामे लावणे, महिला शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, टोमणे मारणे, किरकोळ, प्रसूती रजा न देणे आणि दिल्यास रजेचा पगार रोख स्वरूपात परत घेणे असा आरोप आंदोलक शिक्षकांनी केला. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी आंदोलनाला भेट देऊन संस्थाचालकांना धारेवर धरले.

या मोर्चात शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पवार,रमेश मोरे, अनिल सकट, आनंद हिरुगडे, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, भरत रसाळे, संतोष आयरे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.