ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला लक्षणीय यश :  राजे समरजितसिंह घाटगे

0
246

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही राज्याबरोबर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

त्यांनी म्हटले आहे की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक आघाडीशी जुळवून घेत पार पडली. तरीही राज्यात ३२६३ जागा जिंकून भाजपा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती पैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने १७६० जागी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९५० हून आधिक उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजे सुमारे ६० टक्के उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपा विरोधी बाकावर असतानाही मतदारांनी दिलेला कौल चांगला आहे. महाविकास आघाडी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यातील आलेले अपयश, प्रामाणिक शेतकऱ्यांना न दिलेले प्रोत्साहनपर अनुदान, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली तोकडी मदत,  न दिलेली वीज बिल माफी याबाबत जनतेत सरकारविषयी नाराजी असल्याचे दिसते. भाजपच्या या यशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांचेसह स्थानिक कार्यकर्त्यांचे व हितचिंतकांचे परिश्रमाचे हे फळ आहे.

जिल्ह्यात भाजपचे शंभरपेक्षा जास्त ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. याचा अर्थ, भाजपाला चांगला जनाधार आहे. जिल्ह्यात तीन पक्ष महाविकास आघाडी एकत्र येऊनही त्यांना ८० ठिकाणी बहुमत मिळाले आहे.