चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी औद्योगिक वसाहतीमधील श्री वैजनाथ इंडस्ट्रीज प्रा. लि. या बंद पडलेल्या कंपनीमुळे ५५ कामगारांना गेले वर्षभर भूकबळीचा सामना करावा लागत आहे. ही कंपनी चालू करून ताबडतोब कामगारांना न्याय मिळावा यासाठी कारखाना कार्यस्थळावर आजपासून आनंदराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे.

श्री वैजनाथ इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी कोरोना आल्यापासून गेले वर्षभर बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या जवळपास ५५ कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. कंपनीच्या चार मालकांनी मुद्दामहून कंपनी बंद पाडल्याचा कामगारांचा आरोप आहे. त्या निषेधार्थ कंपनीच्यासमोर आज (गुरुवार) पासून कामगारांनी सत्याग्रही बेमुदत धरणे आंदोलन आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे. या आंदोलनात राजेश देसाई, गजानन हलगेकर, जक्कापा हुंद्रे यांच्यासह ५५ कामगार आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.

यामध्ये कंपनी पूर्ववत चालू करणे व मागील पगार मिळणे ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. कंपनी मालक आणि कामगार यांच्यात बैठक घडवून कायदा व सुव्यवस्था विभागाने तातडीने न्याय द्यावा, अशी विनंती आंदोलन स्थळावरून चंदगड पोलिसांना करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.