कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. देवाचा पालखी सोहळा २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मात्र या मानकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. विनय कोरे आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दरवर्षी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गुलाल खोबऱ्यांच्या उधळणीत श्री जोतिबाची यात्रा होत असते. यावेळी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. गतवर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यंदाही यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.