कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गुढीपाडवा मराठी नवं वर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या दिवशी शिक्षणाचा श्री गणेशा करण्याची परंपरा आजही कायम आहे. या शुभ मुहूर्तावर प्रवेश घेण्यासाठी जरगनगर येथील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर येथे प्रवेश घेण्यासाठी पालकांची आणि लहान मुलांची एकच झुंबड उडाली.

महापालिकेच्या शाळा मोडकळीस आल्या असे वाटत असतानाच गेल्या दोन-चार वर्षात काही शाळांना सोन्याचे दिवस आले आहेत. त्यापैकी एक नंबरची शाळा म्हणजे जरगनगर विद्यामंदिर.

आज पाडव्याच्या मुहूर्तावर अंगणवाडी, बालवाडीपासून पुढील वर्गात प्रवेश घ्यायला पालकांनी सकाळपासूनच शाळेच्या परिसरात गर्दी केली. प्रवेशासाठी वर्गनिहाय पालकांच्या रांगा लावून अगदी शिस्तबद्धपणे प्रक्रिया राबवण्यात आली. मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षक वर्ग त्यासाठी कार्यरत होते. एकीकडे खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असताना महापालिकेच्या शाळांना चांगले दिवस येत आहेत ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.