वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील श्री जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही भाविकांविनाच आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. आज (शुक्रवार) यात्रेचा मुख्य दिवस होता. एरवी भाविकांमुळे गजबजून जाणाऱ्या मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट होता. आज सकाळी नित्यक्रमाने श्री जोतिबा देवास व श्री चोपडाई देवीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर श्री जोतिबा देवाची राजेशाही पूजा व श्री चोपडाई देवीची पूजा बांधण्यात आली.

आज सायंकाळी आदिमाया चोपडाई देवीची दूर्वा, लिंबू, बेल, थंडावा देणारी वनस्पतींनी वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधण्यात आली. या वेळी जग कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त होऊ दे, असे साकडे पुजाऱ्यांनी देवीला घातले.

शुक्रवारी सूर्यास्तावेळी श्री चोपडाई देवीची आरती होईल. अहोरात्र मंदिरातील धार्मिक विधी सुरू राहणार असून उद्या (शनिवारी) रोजी सकाळी ६ वाजता धुपारती सोहळा होणार आहे. यात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डोंगरावरील सर्व रस्ते बंद केले करण्यात आले असून कोणत्याच भाविकाला प्रवेश दिला जाणार नाही.