कागल (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने २५ वर्षावरील सर्वांनाच लस उपलब्ध करून द्यावी. ही लस बाजारात कुठेही उपलब्ध झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोरोना संसर्गाचा कहर वाढतच असल्यामुळे या परिस्थितीशी लढण्यासाठी जय्यत तयारी ठेवूया, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गाचा व लसीकरणाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, ब्राझील, अमेरिकापाठोपाठ कोरोना संसर्गात भारताचा नंबर लागतो. त्यामध्येही महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केंद्राने भेदाभेद व राजकारण न करता लस उपलब्ध करून दिली पाहिजे. कोरोना संसर्गाशी लढताना व लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण उद्भवल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क साधवा. ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांनी सज्ज रहावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी यावेळी केले.

या बैठकीला तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी आदी उपस्थित होते.