शिरोळ (प्रतिनिधी) : कोरोना लसीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोप होऊ लागले असताना आता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी लसीकरणाच्या तुटवड्याला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने   राज्यात लसींचा साठा संपत आला आहे, असे त्यांनी आज (शुक्रवार) येथे सांगितले. 

याबाबत मंत्री यड्रावकर म्हणाले की, लसीच्या उपलब्धतेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून लस उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सावत्रपणाची वागणूक मिळणार नाही, असे ते म्हणाले. शिरोळ तालुक्यात केवळ १०० लसी शिल्लक असून कोल्हापूर जिल्ह्यातील फ्रंट लाईनवरील व ९८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. परंतु ४५ वर्षावरील नागरिकांना लस देताना तुटवडा जाणवत आहे. पण राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी तत्परतेने लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वेगाने सर्वांना लसीकरण केले जाणार असल्याचे यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.